छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 फूट उंच पुतळा उभारणार
रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याच्या कामाने वेग घेतला असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर पर्यटनच्यादृष्टीने विचार करून शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीसह छत्रपतींचा इतिहास नजरेखालून घालता येणार आहे. या शिवसृष्टीमध्ये 24 फूट उंच छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. पर्यटनाच्यादृष्टीने ही शिवसृष्टी रत्नागिरीकरांचे गौरवाचे एक स्थान बनेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 17 कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या कामाची पाहणी करून वेगाने काम पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रशासनास योग्य ते निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.