चिपळूण:-सावर्डे येथे एका महिलेच्या घरातून तब्बल 5 किलोहून अधिक गांजा सापडल्याच्या खळबळजनक घटनेनंतर याप्रकरणी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून रविवारी त्या महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, चिपळुणात पुन्हा एकदा गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून यात महिला सकिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मीनाक्षी छोटू जयस्वाल (51, सावर्डे बाजारपेठ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पान टपरीवर छुप्यापध्दतीने गांजा विक्री होत असल्याने चिपळूण पोलिसांनी पानटपरी तपासणी मोहीम सुरु केली आहे.
या तपासणी मोहिमेत खेर्डी-माळेवाडी येथे साईराज कदम याच्या पान टपरीतून 50 ग्रॅम वजनाचा 2200 रुपये किंमतीचा गांजा सापडल्याने त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून त्याने हा गांजा सावर्डे येथील मीनाक्षी जयस्वाल हिच्याकडून आणल्याची माहिती पोलिसाना दिली. सावर्डे पोलिसांनी जयस्वाल हिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून 1 लाख 18 हजार 160 रुपये किंमतीचा तब्बल 5 किलो 908 ग्रँम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.