4 जून ऑनलाईन अर्ज करण्याला अंतिम मुदतवाढ
रत्नागिरी:-राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई कायद्याअंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून पालकांना आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी येत्या 4 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपर्यंत 812 जागांसाठी 744 पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत.
या आरटीई प्रवेशासाठी पालकांना 4 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत पाल्याचा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे पत्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले आहे.
दरवर्षी सुमारे 3 लाख पालक आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरतात. 31 मे रोजी दुपारी चार वाजेपर्यंत दोन लाख 24 हजार 671 विद्यार्थ्यानी आरटीई प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरले होते. राज्यातील 9 हजार 207 शाळांमधील आरटीईच्या 1 लाख 5 हजार 116 जागांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही पालकांकडून केली जात होती. काही कारणास्तव अनेक पालक आरटीई प्रवेशाचा अर्ज भरू शकले नाही. त्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज उद्या 4 जून पर्यंत भरता येणार आहेत.