संगमेश्वर पोलिसांकडून आता पुण्याकडे सोपविणार, आणखी गुन्हे होणार उघड
राजापूर / प्रतिनिधी:-दुचाकी चोरी प्रकरणी राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेले दोन संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर येथील न्यायालयाच्या परवानगी नंतर प्रथम संगमेश्वर आणि आता पुणे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याने त्यांना ताब्यात घेतले. संशयित आरोपींकडे सापडलेले दोन ॲपल कंपनीचे मोबाईल कोरेगाव पुणे येथील चोरी प्रकरणातील असून त्या पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काही दिवसापूर्वी राजापूर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक केली होती. त्यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधार गृह करण्यात आली होती. अन्य दोघे संशयित आरोपी दीपक श्रीमंदिलकर आणि अजय घेडगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासामध्ये या तिघा संशयित आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे असल्याचे समोर आले. दोन मोटारसायकल वरून त्या तिघा संशयीत्यांनी मुंबई -गोवा महामार्गांवर ओणी येथे दहशत दाखवून काही जणांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. व तेथून अनुस्कुरा मार्गे पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न जागरूक राजापूर पोलीसांनी हाणून पाडला होता. अथक प्रयत्नानंतर पोलीसांनी तिघा संशयीतांना अटक केली होती. सखोल चौकशीअंती त्या तिघांनी अनेक ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या पैकी पुणे आणि संगमेश्वर येथून दुचाकी ची त्यांनी चोरी केली होती. तर पुणे कोरेगावपार्क सह पुणे फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. पुणे शहर कोरेगाव येथून स्कुटी वरून जाणाऱ्या दोन मुलींच्या हातातील ॲपल कंपनीचे मोबाईल त्या दोघा संशयीतांनी हिसकावून घेतले होते. आणि पलायन केले होते. त्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राजापूर पोलिसांनी पकडलेल्या त्या संशयीतांकडे दोन ॲपल कंपनीचे मोबाईल सापडले होते. चोरी प्रकरणी त्या दोघा संशयीतांवर दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. यापूर्वी काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्या संशयीतांचा ताबा मिळावा म्हणून त्या ठाण्याच्या वतीने येथील न्यायालयाकडे रीतसर अर्ज करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या परवानगी नंतर सर्वप्रथम संगमेश्वर व त्यानंतर आता पुणे कोरेगाव पार्क पोलिसांनी त्या संशयीतांचा ताबा घेतला आहे. दुचाकी चोरी प्रकरणी त्या संशयीतांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून आता त्याची उकल होणे शक्य झाले आहे.