चिमुकलीच्या मृत्यूने सारेच सुन्न
मंडणगड:-तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मे महिन्याच्या सुट्टीत आनंद लुटण्यासाठी गावी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशने मृत्यू झाल्याची घटना वेळास येथे घडली. मुग्धा राकेश बटावळे (१३, वेळास) असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. ती मुंबई येथे इयत्ता सहावीत शिकत होती.
दोन दिवसांपूर्वी मुग्धा व तीची कुटुंब आपल्या मूळ गावी मंडणगड येथे आले होते. मुग्धा सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास बाथरूमसाठी घराबाहेर गेली. याच वेळी तिला काहीतरी पायाला लागलं, मात्र मुग्धाला ते समजलं नाही. पायाला लागल्यानंतर ती तशीच घरात आली. तिच्या पायातून रक्त येऊ लागलं, मात्र आपल्या पायाला काटा लागला असेल अस समजून तिने घरच्यांना आपल्याला पुन्हा जरा वेळ झोप येत असल्याचं सांगितलं. मात्र तासभर झाला तरी मुग्धा उठली नाही, म्हणून घरचे उठवायला गेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिचा केवळ श्वास सुरू होता. त्याचवेळी घरचे घाबरून गेले. काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ देव्हारे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मुग्धाला दाखल केलं. मात्र डॉक्टरनी तपासून तिला मृत घोषित केलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. हसती खेळती मुलगी क्षणार्थात काळाने हिरावून नेली. अचानक घडलेल्या या घटनेने सारे सुन्न झाले.