गुहागर तालुक्यात वर्षभरात एकूण ४७ प्रकरणे, लाभार्थ्यांना वाटप
गुहागर/वार्ताहर:-गुहागर तालुक्यात २०२३-२४ या वर्षभरात वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे सुमारे ५ लाख भरपाईचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. गेले वर्षभरात एकूण ४७ प्रकरणे वन विभागाकडे आली होती. ही सर्व प्रकरणे मंजूर होऊन आलेली नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती गुहागरचे वनपरिक्षेत्र वनपाल परशेट्ये यांनी दिली.
गुहागर तालुक्यात जंगल तोडीमुळे मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी हे नागरी वस्तीमध्ये घुसून शेतीचे नुकसान करून, पाळीव जनावरे, मनुष्य यांच्यावर हल्ले करीत आहेत. डुक्कर, गव्यासारखे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २४ दरम्यान गुहागर तालुक्यात अशी ४७ प्रकरणे घडल्याच्या नोंदी वन विभागाकडे झाल्या आहेत. यामध्ये वन्यप्राण्यांकडून पाळीव पशुंच्या हत्येप्रकरणी २६ प्रकरणे असून २ लाख ३५ हजार ३५० इतकी नुकसानभरपाई, शेतीपीक नुकसानीची २० प्रकरणे असून १ लाख ३५ हजार ५८२ इतकी भरपाई तर वन्यजीव मानव संघर्षाचे १ प्रकरण असून १ लाख २५ हजार असे एकूण ४ लाख ९५ हजार ९३२ इतकी नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यात काही वर्षांत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांच्याकडून पाळीव प्राणी किंवा मनुष्यांवर हल्ल्याची घटनाही वारंवार घडत आहेत. अगदी शहरा लगतच्या गावांमध्येही बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. घरांच्या अंगणामध्ये येऊन कुत्र्यांना पकडून नेल्याचेही प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी देवघर येथे मध्यरात्रीच्या सुमारास
रस्त्यावर बसलेल्या बिबट्याला मोठ्या वाहनाने उडवले होते. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. तसेच पालपेणे- पवारसाखरी मार्गावर रात्रीच्या वेळी डुकरांचा कळप रस्ता पार करताना एक रिक्षा पलटी होऊन चालक जखमी झाला होता. अशी असंख्य प्रकरणांची नोंद वन विभागाकडे करण्यात आलेली आहे.