“तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी तरूण पिढीस जागृत करणे काळाची गरज” : जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे
खेड:- तंबाखूचे दुष्परिणामाविषयी ज्येष्ठांनी तरूण पिढीस जागृत करणे काळाची गरज आहे, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती, खेडचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश – १ डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले.
खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश १ डॉ. देशपांडे म्हणाले, तंबाखूमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होतात.माणसाच्या शरीरातील सर्व क्रियांवर तंबाखूचे दुष्परिणाम होत असतात, सिगरेटचे सेवन केल्याने फुफ्फुसामध्ये अनेक विष द्रव्य साचून फुप्फुसाची क्षमता कमी होते तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्या व्यसनावर माणसे प्रचंड पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक गणित बिघडते. मन कमकुवत बनते शरीर खंगून जाते. तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्यामध्ये वैफल्य निर्माण होते. वैफल्य आणि व्यसनाधीनता या चक्रामध्ये तरुण अडकतो. त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या सर्व व्यसनाधीन लोकांचे तरुणांचे याबाबतीत प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक बाबी डॉक्टर देशपांडे यांनी विशद करून सांगितल्या.
व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती करण्यात येईल, अशी ग्वाही आणि भावना ज्येष्ठ नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकवृंद मोठ्या संख्यने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, खेडचे अध्यक्ष आबा निकम व सदस्य ओमप्रकाश लठ्ठा तसेच तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी एस. के. जोशी व सहदेव अंधारे यांनी परिश्रम घेतले.