दापोली:-दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलचं महत्त्व व आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार २ जून २०२४ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:१५ वाजता सुरु होईल. ती उदयनगर, लष्करवाडी, आनंदनगर, बर्वेआळी जालगाव, पांगारवाडी, नर्सरी रोड, आझाद मैदान अशा ७ किमी मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांच्या घरी जाऊन त्यांनी राबवलेल्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी अनेक उपक्रमांबद्दल माहिती करुन घेण्यात येईल.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.