चिपळूण : तालुक्यातील कुडप येथे ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर ग्रामस्थांने चौथ्यांदा केलेले अतिक्रमण अखेर प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मार्ग मोकळा झाल्याने येथील राजेंद्र राजेशिर्के यांनी गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेविकेला धन्यवाद दिले आहेत.
कुडप येथील या रस्त्याची ग्रामपंचायतीकडे नोंद आहे. त्यामुळे रस्त्याचे शासकीय निधीतून मजबूतीकरण करण्यात आले आहे. मात्र निधीअभावी त्याचे डांबरीकरण रखडले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या रस्त्यावरून रहदारी सुरू होती. मात्र, एका ग्रामस्थाने रस्त्याच्या जमिन मालकीबाबत आक्षेप घेत रस्त्यावर कुंपण घालून तेथील वाहतूक बंद केली. यावर राजेंद्र राजेशिर्के यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करीत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीनुसार हे अतिक्रमण काढण्यात आले. त्यावरुनही वादावादी झाल्यानंतर काढलेले अतिक्रमण पुन्हा जैथे थे राहिले. त्यामुळे काही महिने अतिक्रमण काढणे व घालणे असा तीनवेळा प्रकार झाला. यावरून अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थावर राजेशिर्के व ग्रामपंचायत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हेही दाखल आहेत. त्यातून या ग्रामस्थाला अटकही झाली होती. असे असताना काही दिवसांपूर्वी राजेशिर्के यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायत व पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तिसऱ्यांदा केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा चौथ्यांदा अतिक्रमण करीत रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे राजेशिर्के यांनी पुन्हा वरील विभागांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासनाने येथे जाऊन हे अतिक्रमण काढून टाकल्याने सध्या रस्ता मोकळा झाला आहे. त्यावरून ग्रामस्थ ये-जा करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याने राजेशिर्के यांनी गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे, ग्रामसेविका स्वप्नाली जाधव यांना धन्यवाद दिले आहेत.
अखेर कुडप रस्त्यावरील अतिक्रमण हटवले
