रत्नागिरी:-रत्नागिरीत आर्थिक व्यवहाराच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्जु टेक्सोल कंपनीने रत्नागिरीकरांना कोट्यावधांचा गंडा घातलेला असतानाच रत्नागिरीतील छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून पिग्मी गोळा करत ‘महामुंबई‘ तील एका कंपनीने लाखोंचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरीत वर्ष दीड वर्षापूर्वीच या महामुंबईतील एका कंपनीने आपले प्रस्थ सुरू केले. येथील स्थानिक छोट्यामोठ्या व्यापाऱ्याकडून पिग्मी स्वरुपात नियमित रक्कम गोळा करण्यास सुरुवात केली. अनेक व्यावसायिकांनी या कंपनीत बचत होईल या उद्देशाने पिग्मीही सुरु केली होती.
कंपनीने त्यासाठी आपल्या कारभाराची छाप पाडण्यासाठी पिग्मी गोळा करणाऱ्या एजंटनाही खुश करण्याची योजना आखली होती. या कंपनीत पिग्मीचे प्रमाण वाढवावे म्हणून चांगले काम करणाऱ्या एजंटना देशांतर्गत अनेक मोठ्या शहरांच्या विमानप्रवासाद्वारे सफरही घडवून आणल्या होत्या. त्यामुळे पिग्मी एजंटदेखील कमालो खुश झाले. त्यांयामध्येही कामी स्पर्धा वाढली होती. त्यांनी अनेक व्यापा-यांना पिग्मीसाठी तयार केले. या कंपनीत नियमित पिग्मी सुरु केली होती. त्याद्वारे दिवसाची लाखों रुपयाची रक्कम यातून गोळा केली जात होती.
पण या कंपनीकडून पुढे व्हायचे तेच अखेर घडले आहे. कंपनीने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून पिग्मीची मुदत झालेल्यांना पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. गुंतवणूक केलेल्या काहींना दिलेले रक्कम धनादेशही वटले नाहीत. त्यामुळे त्यांनीही पैसे मिळवण्यासाठी या कंपनीकडे पाठपुरवठा सुरु केला होता. एवढा झोल सुरू झाल्यानंतरही कंपनीत पिग्मी गेले काही महिने सुरु राहिली होती.
शहरातील साळवीस्टॉप परिसरात या कंपनीचे कार्यालय आहे. आता तर मागील पाच सहा दिवसांपासून या कंपनीचे कार्यालयाला कुलूप पडले आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पिग्मीधारक व्यापाऱ्यामध्ये मोठी चुळबुळ सुरू झालेली आहे. कंपनीने त्या कार्यालयाचे भाडेही थकवले असल्याची जोरदार चर्चा आता या परिसरातील नाक्यावर सुरु आहे. रत्नागिरीत पिग्मीच्या नावाखाली व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घातला आहे.