चिपळूण :तालुक्यातील कान्हे पिंपळी येथील निराधार आणि दिव्यांग असलेल्या सुधा मोहिते रा. पिंपळी खालची बौद्धवाडी यांच्या घराच्या पडवीवर सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे झाड कोसळून पडवीचे नुकसान झाले आहे. मात्र, जीवित हानी टळली आहे.
तालुक्यातील कान्हे पिंपळी येथील सुधा मोहिते या आपल्या घरात चुल्यावर चहा करत असतानाच पाऊस व सोसाट्याचा वाऱ्याने अचानक त्यांच्या घराच्या पडवीवर झाड कोसळले. त्यांचा बालंबाल जीव वाचला. परंतु सुधा मोहिते यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. सुधा मोहिते यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. गेली अनेक वर्ष मोहिते यांना पतीच्या पश्चात जगण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यातच त्या दिव्यांग आणि निराधार असल्याने त्यांचा जीवन प्रवास एक दुर्दैवी कहाणी बनली आहे. ही महिला चिपळूण येथील समाज कल्याण वसतीगृहात मदतनीस म्हणून काम करत होती. सतत आजारी असल्याने त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागले. सुधा मोहिते या माहेरातच राहायच्या. परंतु अवकाळी पावसाच्या वाऱ्यामुळे घराच्या पडवीवर झाड कोसळले. त्यामुळे त्यांची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. शासनाने त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी जनजागृती संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सावंत यांनी केली आहे. सुधा मोहिते यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
पावसामुळे बिघर झालेल्या दिव्यांग, निराधार सुधा मोहिते यांना मदतीची गरज
