भाजप युवा मोर्चाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण/प्रतिनिधी: शहरातील शंकरवाडी रस्ता विकास आराखड्यानुसार १२ मीटरचा होत आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला अधिक गती येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्य रस्तेही विकसित करा, अशी मागणी भाजपच्या शहर युवा मोर्चा शाखेने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शंकरवाडी रस्ता १२ मीटरचा झाल्यानंतर विभागाच्या या विकासाला अधिक गती येणार आहे. त्याचप्रमाणे विकास आराखड्यातील प्रस्तावित १२ मीटरचे काविळतळी राहुल गार्डन ते शंकरवाडी रेल्वेस्टेशन, कै. बापू खेडेकर घराजवळील कै. जे. बी. हरधारे गुरूजी मार्ग, त्यापुढील रस्ता हा देखील मोठा झाल्यास रेल्वे स्टेशन, शंकरवाडी मुरादपूर, पेठमाप या प्रभागामधून दळणवळण करणे सोईचे होऊन हा परिसर विकसित होण्यात मदत. होईल असे आमच्या प्रभागातील नागरिकांना वाटते. त्यामुळे हे रस्तेही तातडीने करावेत अशी मागणी केली आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सावेर्डेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे, उपाध्यक्ष जतिन घटे, महेश कांबळी, सरचिटणीस अभिजीत सावर्डेकर, द्वारकेश मेस्त्री आदी उपस्थित होते.