यावर्षी १०० जणांना मिळणार संधी, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात
गुहागर/वार्ताहर:-येत्या शैक्षणिक वर्षापासून कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा सहयोग संस्थेकडून शिष्यवृत्ती स्वरूपात अर्थसहाय्य केले जाणार आहे. दहावीमध्ये किमान ७५ टक्के आणि बारावी तसेच पदवी परीक्षेत प्रथम वर्ग मिळविलेल्या पात्र गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. ‘इच्छुक आणि गरजू विद्यार्थ्यांकडून माहिती मागवली असून पहिल्या वर्षी शंभर विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या कौशल्य विकास विभागाच्या समन्वयिका डॉ. कीर्ती आगाशे यांनी दिली.
गेल्या १५ वर्षांत राज्यातील दोन हजारांहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सेवा सहयोग संस्थेकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. यावर्षी या योजनेत वैद्यकीय सेवा क्षेत्रातील ३२ आणि तंत्रशिक्षण विभागातील ३० अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ पैशाअभावी कुणाही गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या हेतूने टीजेएसबी बँकेतून सौईओ म्हणून निवृत्त झालेल्या रविंद्र कर्वे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने २००८मध्ये ठाण्यात ही संस्था सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील या सकारात्मक आणि उपयुक्त चळवळीचा आतापर्यंत राज्यभरातील हजारो विद्याथ्यांनी लाभ घेतला आहे.
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम
तंत्रशिक्षण विभागात दुचाकी/तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रिक वाहन बॅटरी तज्ज्ञ, अॅडव्हान्स इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, दुल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग, मशिन मेंटेनन्स आदी अभ्यासक्रमांसाठी गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या इंडस्ट्रियल सेफ्टी, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, सीएनसी मशिद्ध आणि सीएनसी प्रोग्रॅमिंग आदी अभ्यासक्रमांसाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
मिळणार आहे.
पॅरामेडिकल अभ्यासक्रम कौशल्य विकास योजनेतून यंदा वैद्यकीय सेवा क्षेत्रातील मेडिकल लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, पॅथॉलॉजी टेक्निशियन, डायलेसिस टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, हॉस्पिटल फ्रंट डेस्क कोऑर्डिनेटर, बीएससी, नर्सिंग, बीएससी, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आदी पदविका, प्रमाणपत्र स्वरूपाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्याथ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी 2024vvy@gmail.com या ईमेल माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२१५५९७१२.
गुणवंत विद्यार्थ्यांना संधी
सर्वसामान्य देणगीदार, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि विश्वस्त संस्थांच्या मदतीतून ही शैक्षणिक चळवळ सुरू आहे. गेल्या आर्थिक वर्षात या योजनेतून ८९७ गरजू विद्यार्थ्यांना ५ कोटी ७६ लाख रूपये उच्च शिक्षणासाठी देण्यात आले. त्यात ४४९ विद्यार्थी आणि ४४८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. ३९४ विद्यार्थी अभियांत्रिकी, १७९ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यातील १३२ विद्यार्थी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहेत. देशातील १३ आयआयटीमध्ये संस्थेचे १८ विद्यार्थी शिकत आहेत. देशातील नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये हे विद्यार्थी उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण
करीत आहेत.