मुंबई : शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी या विरोधात रान उठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात बुधवारी (29 मे) महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले.
या आंदोलनावेळी आव्हाड आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून मनुस्मृतीचे दहन केले. पण हे आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही फाडला. याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्यासह 24 जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी चवदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला आणि मनुस्मृती दहन आंदोलनात त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली, परंतु या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले. शिवसेना, भाजपा आणि अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडत आंदोलन केले. दरम्यान, याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृती जाळून आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्याप्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर करवाई व्हावी, अशी मागणी केली होती. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या 23 कार्यकर्त्यांवर शासनाच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महाड पोलीस प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग म्हणून नोटीस बजावली होती. मात्र तरीही जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर भा.द.वि. कलम 1860 नुसार सेक्शन 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(1), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 135 या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.