लांजा:-तालुक्यातील हर्चे पनोरचीवाडी येथील ४५ वर्षीय प्रौढ विवाहिता गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता झाली असून ती घरातून निघताना कोणाला काहीच न सांगता निघून गेली, मात्र घरात न परतल्याने तिच्या पतीने लांजा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुशाली राजेंद्र तरळ (वय-४५, रा.हर्चे, पनोरचीवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) ही शनिवार २५ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बॅग भरून कोणाला काहीच न सांगता निघून गेली. ती घरी परत न आल्याने राजेंद्र पांडुरंग तरळ (वय ४८, रा.हर्चे पनोरचीवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर राजेंद्र तरळ यांनी बुधवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस स्थानकात आपली पत्नी रुशाली तरळ ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
रुशाली राजेंद्र तरळ (वय ४५) हिची उंची ४ फुट, रंग सावळा, अंगाने मध्यम, केस काळे व लांब, चेहरा उभट, कानात झुमके, नाकात फुली, गळ्यात एकसर मंगळसुत्र, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, पायात पैंजन व सँण्डल असून नेसणीस लाल रंगाची फुले असलेली साडी व लाल रंगाची ब्लाउज असून तिचे जवळ इंटेक्स कंपनीचा साधा मोबाईल असून सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तेजस मोरे करत आहेत.