खेड:-तालुक्यातील बोरघर, कोतवली, दस्तुरी येथे बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर धाडी टाकल्या. या धाडीत गावठी हातभट्टीचा दारूच्या ऐवजासह देशी विदेशी मद्यसाठाही पोलिसांनी हस्तगत करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईने बेकादेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील कोतवली येथील टेपभोईवाडी येथे पोलिसांनी धाड टाकून 3400 रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या प्रकरणी कुमार अनंत जुवळे (कोतवली टेपभोईवाडी) यायावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून त्यास रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील बोरघर भांडारवाडी येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 1300 रूपये किंमतीचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी अविनाश यशवंत मयेकर याच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडे बिअरच्या बाटल्या गावठी हातभट्टीची दारू आढळली. या बाबत महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता कलिंगणे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तालुक्यातील दस्तुरी येथील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 900 रूपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी बबन वसंत पवार (रा. दस्तुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये तीन ठिकाणी गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर धाड
