नागपूर:-मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच राहतो आणि शिक्षण घेण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते. हे सिद्ध केलं आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातल्या सुजाता पाटील या आजींनी. 60 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत 60 ट्टके मिळवले आहेत. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या ६० वर्षीय आजीने प्रकाश हायस्कूल कांद्री माईन या शाळेतून नई किरण योजना अंतर्गत १६ नंबरचा फॉर्म भरला होता. त्यानंतर दहावीची परीक्षा देत घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुजाता पाटील या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करत असताना दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. घरातील मंडळींनीही त्यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळे सुजाता पाटील या आजींनी दहावीत चक्क ६० टक्के गुण मिळवले. यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा या निकालाची चर्चा जास्त झाली.