राजापूर:-एका 74 वर्षीय वृद्धाला अवदसा सुचली आणि अश्लील व्हिडिओच्या नादात साडेचार लाख रुपये गमावून बसण्याची वेळ आली. व्हॉट्सऍप व्हिडीओ कॅलवर अश्लील चाळे करून नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल साडेपाच लाख रूपयाला गंडा घातल्याची खळबळजनक घटना राजापूर तालुक्यातील ओणी येथे घडली. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओणी येथील एकाकी जीवन जगणाऱ्या एका 74 वर्षीय वृध्दाला त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सऍपवर एका तरूणीचा व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलवर या तरूणीने अश्लिल चाळे केले. त्यानंतर या व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग करून तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित वृध्दाकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी विक्रम राठोड नामक व्यक्तीने संबंधित वृध्दाला फोन करून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून व्हिडीओ कॉल केलेल्या तरूणीने अश्लिल व्हिडीओमुळे आत्महत्या केल्याचे सांगत तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने राहूल शर्मा नामक व्यक्तीने संबंधित वृध्दाला फोन करून मी तुम्हाला या केसमधून सुखरूप सोडवतो असे सांगत त्याकरीता 70 हजार रूपयांची मागणी केली. बदनामीच्या भितीने संबंधित वृध्दाने शर्मा नामक व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे अमित हालदर नामक व्यक्तिच्या बँक खात्यात 70 हजार रूपये भरले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राहूल शर्मा व विक्रम राठोड नामक दोन्ही व्यक्तींनी संबंधित वृध्दाला फोन करून सदरचा अश्लिल व्हिडीओ मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत एक लाख रूपयांची मागणी केली.
अशाप्रकारे वारंवार व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित वृध्दाकडून सुमारे साडेपाच लाख रूपये उकळण्यात आले. अखेर संबंधित वृध्दाकडील सर्व पैसे संपल्यानंतर संबंधित वृध्दाने त्याच्या नातलगाला या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर संबंधित नातेवाईकाने त्या वृध्दाला घेऊन राजापूर पोलीस स्थानक गाठले व या फसवणुकीची तक्रार दाखल केली.