खेड:-तालुक्यातील तळघर येथेही गेल्या पंधरा महिन्यांपासून वीज चोरी करून 76 हजार 93 युनिटस वापर करत महावितरणची 13 लाख 34 हजार 390 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रामचंद्र भागोजी बुदर, राकेश रामचंद्र बुदर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पेण येथील महावितरणच्या भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता विजय राजेश धरमसारे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिल्याचे समजते. लोटे एमआयडीसी उपविभाग यांच्या अखत्यारित येणाऱ्या तालुक्यातील तळघर परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वत: विजय धरमसारे, सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम, सहाय्यक व अधिकारी शशिकुमार तांबे, वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांया पथकाने वीज ग्राहक रामचंद्र भागोजी बुदर व वापरदार राकेश यांच्या मालकीच्या खणीवर वीज पुरवठा असलेल्या वीज संचाची तपासणी केली.
या मीटरमधून वापरत असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी वीज मीटर हाताळलेला निदर्शनास आला. या मीटरच्या टर्मिनलचे स्क्रू सैल करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले व पल्स बंद करीत असल्याचे आढळून आले. जेणेकरून वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये होणार नाही. अशा प्रकारे वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. अनधिकृतपणे वीजेचा वापर केल्याचा ठपका ठेवत वीज मीटर सील करून ताब्यात घेतले.
ही वीज चोरी जानेवारी 2023 ते मार्च 2024 या कालावधीत झाली असून 76 हजार 93 युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे. तब्बल 13 लाख 34 हजार 390 रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये 13 लाखांची वीज चोरी, दोघांवर गुन्हा
