रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी रुग्णवाहिकाचालक गेले दोन महिने वेतनाविना आहेत. यापैकी मार्च महिन्यातील केवळ 15 दिवसांचेच वेतन ठेकेदाराने मोजक्याच चालकांना दिले आहे. अजून एप्रिल महिन्याचे वेतन दिलेले नसल्याने चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 102 रुग्णवाहिका गेली 19 वर्षे अहोरात्र 24 तास विनाअपघात सेवा देत आहेत. त्यांचे मार्च ते एप्रिल असे गेले 2 महिने मानधन रखडले आहे. मात्र, यामुळे रात्रंदिवस रुग्णवाहिकेवर सेवा बजावणाऱ्या चालकांना याचा मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाकडून येणारे अनुदान कधी वेळेत येत नाही. मात्र, ते आले की, आरोग्य विभाग ठेकेदाराला वर्ग करते. तत्पूर्वी ठेकेदाराने स्वतच्या खिशातून वेतनाची रक्कम रुग्णवाहिका चालकांना देणे बंधनकारक असल्याचा नियम आहे.
मात्र, काही ठेकेदारांकडून तसे होत नाही. रत्नागिरी जिह्यातील वाहनचालकांचा ठेका 13 मार्च 2024 पासून पुणे येथील एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीच्या ठेकेदाराने मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन न दिल्याने काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिका चालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे ठेकेदाराने मार्च महिन्याचे शिल्लक दिवसांचे वेतन काही चालकांना दिले असून काही अजून प्रतिक्षेत आहेत. तसेच एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप दिलेले नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे.