राजापूर:-मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळे येथील हॉटेल ग्रीन पार्कसमोर रस्त्याकडेला पार्क करून ठेवलेल्या अपघातग्रस्त चारचाकी वाहनाचे चारही टायर अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहीदअली मोहमदसलीम चौगुले (39, रा. साईनगर, राजापूर) यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साईनगर येथील शाहीदअली चौगुले हे शुक्रवारी रात्री कुटुंबियांसमवेत आपल्या चारचाकी वाहनाने डोंगर दत्तवाडी येथे अंत्यविधीसाठी गेले होते. रात्री उशीर होणार असल्याने त्यांनी गाडीवरील चालकाला पत्नी व मुलांना घरी सोडून मला घेण्यासाठी परत दत्तवाडी येथे येण्यास सांगितले. दरम्यान चालक मुजाहिद मुजावर चौगुले यांच्या कुटुंबियांना सोडून मुंबई-गोवा महामार्गाने परत दत्तवाडी येथे जात असताना उन्हाळे येथील ग्रीन पार्क हॉटेलसमोर अचानक गुरे आडवी आल्याने चालकाने तत्काळ ब्रेक केल्याने गाडी दुभाजकावर आदळून अपघात झाला. या बाबतची माहिती मिळताच चौगुले दुचाकीने घटनास्थळी दाखल झाले. चारचाकी गाडीचे पुढील चाक वाकल्याने गाडी रस्त्याकडेला उभी करून ते घरी निघून गेले. दरम्यान रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास अपघातग्रस्त गाडी नेण्यासाठी टोईंग व्हन आली असता गाडीचे चारही टायर गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी रात्रीच्यावेळी सुमारे 32 हजार रूपये किंमतीचे टायर, मकव्होल, नटबोल्ट, वॉल आणि सिंम्बाल असा सुमारे 1 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल चारून नेल्याचे चौगुले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
भिकारी चोरांची करामत, अपघातग्रस्त गाडीचे टायरच नेले चोरून
