चिपळूण/प्रतिनिधी : सदाबहार असलेल्या कोकणच्या निसर्गाची भुरळ पर्यटकांबरोबरच वन्यजीवांनाही आहे. येथील निसर्गाचे आकर्षण खासकरून पावसाळ्यात बहरणाऱ्या निसर्गाची ओढ अनेक पक्ष्यांना लागते. त्यातच ओडिके अर्थात तिबोट्या या पक्ष्याला विणीच्या हंगामात कोकणातील निसर्गाची भुरळ पडली नाही तर नवलच!
दरवर्षी मे अखेर ते पावसाळ्याच्या सुरुवातीला विणीच्या हंगामात पक्षी निरीक्षकांचा आवडता व दुर्मीळ असलेला अर्थात तिबोट्याचे आगमन चिपळूण परिसरात होते. याच आगमनाची उत्सुकता आणि प्रतिक्षा पक्षी निरीक्षकांना पावसाळ्याच्या तोंडावर सुरू होते. त्यानुसार यंदाही ओडिकेच्या आगमनाने पक्षी निरीक्षकांची उत्सुकता आणि प्रतिक्षा पूर्ण झाली आहे. ओडीके अर्थातच तिबोटी खंड्या हा गेली अनेक वर्षे चिपळूण शहर परिसरात विणीच्या हंगामात स्थलांतरित होतो. देशभरात तसेच परदेशातील काही देशांमध्ये याचे अधिवास आहेत. मूळ घनदाट जंगलात राहाणारा हा पक्षी विणीच्या काळात चिपळूणसारख्या सदाहरित निसर्ग भागाकडे येतो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात याचे वास्तव्य आढळते. चिपळुणात विणीसाठी येणाऱ्या या तिबोट्या पक्ष्याला कॅमेराबद्ध करून फ्रेममध्ये टिपण्याची पक्षी निरीक्षकांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असते. याचे आगमन चिपळूण परिसरात झाल्याची कुणकुण लागताच अनेक हौशी व अभ्यासू पक्षी निरीक्षक त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी चिपळूणकडे धाव घेतात. परजिल्हा, परराज्यातील पक्षी निरीक्षकांसह काही परदेशी पक्षी निरीक्षकदेखील ओडीकेला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये घेण्यासाठी चिपळुणात येतात. सदाहरित घनदाट जंगलात वावरणारा हा सुमारे सहा ते आठ सें.मी. लांबी व दहा ते पंधरा ग्रॅम वजनाचा हा पक्षी अत्यंत आकर्षक दिसतो. वेगवेगळे जवळपास सप्तरंगांची उधळण या पक्ष्याच्या देहावर असते. शेपटीपासून चोचीपर्यंत ते डोळ्यापर्यंत, पंखाची वरील व पोटाकडील बाजू अशा ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची मुक्त उधळण निसर्गाने या पक्ष्यावर केली आहे. हा पक्षी पाहण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचे आगमन झाल्यावर अनेक पक्षी निरीक्षक त्याच्या वीण हंगाम काळातील अधिवासाचा शोध घेण्यास सुरुवात करतात. विणीच्या काळात आलेला हा पक्षी डोंगर कपारीच्या मऊ जागेसह टेकाडातील मातीच्या जागांमध्ये घरट्यामध्ये अंडी घालून पिल्लांचे संगोपन करतो. कायम अस्थिर असलेला व सहसा माणसांच्या सहवासात जवळपास न दिसणारा हा पक्षी काही प्रमाणात लाजाळू देखील आहे. अशा या ओडीकेचे आगमन चिपळूण परिसरात झाले असून आता पक्षी निरीक्षकांची त्याचा अभ्यास व ठावठिकाणा शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यातही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची छायाचित्रे मिळावीत या क रिता चढाओढ सुरू झाली आहे. तिबोट्याचे आगमन झाल्याची छायाचित्रे काही पक्षी निरीक्षकांनी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास सुरुवात केली आहे.
चिपळूण परिसरात पक्षी निरीक्षकांच्या कॅमेर्याने टिपला पाहुणा तिबोट्या
