चिपळूण/प्रतिनिधी: चिपळूण वन विभागामार्फत वानर, माकड प्रगणना या विषयावर प्रादेशिक वन व सामाजिक वनीकरण विभागांतील सर्वक्षेत्रिय अधिकारी, कमर्चरी जिल्ह्यातील पोलीस पाटील, सर्पमित्र, प्राणी मित्र, यांना मार्गदर्शन करण्यासाठी सावर्डे येथील स्व. गोविंदरावजी निकम फार्मसी कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली एक दिवशीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
जिल्ह्यामध्ये माकड व वानर यांच्यामुळे फळझाडांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड व वानर यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील माकड व वानर बाधीत क्षेत्र शोधून तेथील त्यांची संख्या मोजणे व त्यांच्या संख्येची झालेली वाढ नोंदविणे याच्या अभ्यासाकरीता वनविभागामार्फत उपाययोजना करण्यात येणार आहे. हे काम २७ ते ३० मे या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. वानर व माकड प्रगणना या विषयावर प्रादेशिक वन विभागातील व सामाजिक वनीकरण विभागातील सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, जिल्हयातील पोलीस पाटील, सर्पमिंत्र, प्राणीमित्र यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेसाठी प्रगनणा करण्याची कार्यपध्दती विषयी प्रात्यक्षिकांसह एच. एन. कुमारा, प्रमुख शास्त्रज्ञ संवर्धन जीवशास्त्र संकॉन कोईम्बतूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गिरीजा देसाई विभागीय वन अधिकारी, वैभव बोराटे सहा. वनसंरक्षक, राजेंद्र पाटील सहा. वनसंरक्षक सामाजीक वनीकरण, निलेश बापट मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी वनीकरण विभागाकडील सर्व परिक्षेत्र वन अधिकारी उपस्थित होते.
चिपळूण वन विभागामार्फत माकड, वानर प्रगणनेसाठी वन विभागाकडून मार्गदर्शन
