चिपळूण/प्रतिनिधी: तालुक्यातील कुडप येथे ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आला होता. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या आधीच ग्रामपंचायत, पंचायत समिती अधिकारी व पोलिसांच्या उपस्थतीत हे अतिक्रमण काढण्यात आले होते. नीतिश केशव शिर्के (कुडप) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद सपना तुकाराम जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडप येथे देवशेतवाडी ते बिबवी कातळ ग्रामपंचायत २३ला नोंद असलेल्या रस्त्यावर शासकीय निधीतून मजबुतीकरण करण्यात आले होते. त्यानुसार येथील वहिवाट सुरू होती. दरम्यान याच रस्त्याच्या लगत असलेले जमीनदार नीतिश शिर्के याने रस्त्याच्या जागेतील मालकीबाबत आक्षेप घेत रस्त्यावर काटेरी कुंपण घालून मार्ग बंद केला. या बाबत सपना तुकाराम जाधव यांनी सावर्डे पोलिसात तक्रार दिली असता त्यानुसार पोलिसांनी शिर्केवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.
कुडपमधील रस्ता बंद प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
