ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
राजन लाड / जैतापूर:-राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दळे येथील स्मशानशेडची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. मात्र याकडे दळे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या स्मशानशेडचे पत्रे पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुर्घटना घडल्यावरच ग्रामपंचायतीला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दळे येथील लासेवाडी धरणवाडी गिरकरवाडी आडीवाडी या सर्व वाडीतील लोकांसाठी असलेल्या स्मशान शेड वरील पत्रे उडालेले असून एक-दोन पत्रे लटकलेल्या अवस्थेत आहेत. गेले काही वर्षात स्मशान शेडची अशीच दुरावस्था झालेली असून ग्रामपंचायतीकडे मागणी करून देखील साधे पत्रे टाकण्याचे काम करता आलेले नाही याची खंत आणि चीड सर्वसामान्य व्यक्त करताना दिसतात.
विशेष म्हणजे या सर्व भागातील रहिवासी सातत्याने आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये देखील शिवसेनेच्या मागे (सध्याची उबाठा शिवसेना) ठामपणे उभे राहत असताना देखील या स्मशान शेडची दुरुस्ती होऊ शकलेली नाही.
गेली अनेक वर्ष या स्मशानातील दुरावस्था झालेली दिसत असताना सुद्धा ग्रामपंचायत किंवा संबंधित लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव पाठवण्यापलीकडे काही झाले नाही का असा प्रश्नही सर्वसामान्य व्यक्त करत आहेत? पावसाळ्यात नेहमीप्रमाणे एखाद्याच्या मृत्यूनंतर लोकांना त्रास आणि मृतदेहाची हेळसांड होणार असेल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नक्की करतं काय हा खरा प्रश्न आहे?
या भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.