रत्नागिरी:- शहरानजिकच्या कारवांचीवाडी रवींद्र नगर येथे चोरट्याने घर फोडून 18 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्याची किंमत सुमारे साडेनऊ लाख रुपये आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष शांताराम गार्डी (रा. रवींद्रनगर, कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे शनिवारी आपल्या गावाला गेले होते. त्यांचे बंद असलेले घर हेरून चोरट्याने त्यांच्या घराचा पुढचा दरवाजा धारदार हत्याराने उचकटून घरफोडी केली आहे. त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. त्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले.
रविवारी 26 मे रोजी गार्डी हे गावावरुन पुन्हा कारवांचीवाडी येथील घराकडे आले. त्यावेळी घराच्या दरवाजाची कडी तोडलेली पाहून गार्डी यांना धक्का बसला. आत जाउन पाहणी केली असता हा घरफोडीचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.