रत्नागिरी : आपली मांडवी स्वच्छ मांडवी या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मांडवीतील स्थानिक व्यापारी, उद्योजक, रत्नागिरीकरांनी एकत्र येत रविवारी सकाळी मांडवी समुद्र किनारा स्वच्छ अभियान राबवले. यात जवळपास ६०० किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. प्लास्टिक कचरा वेगळा केला असून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
सध्या रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. संध्याकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे किनाऱ्यावर कचरा टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊचे रॅपर्स, शेंगांची टरफले, कणसे आदींचा कचरा किनाऱ्यावर पसरलेला दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोशल मीडियावर “आपली मांडवी स्वच्छ मांडवी”साठी रत्नागिरीकरांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला रत्नगिरीकरांनी प्रतिसाद दिला.
रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना अस्वच्छतेचे दर्शन घडू नये यासाठी रत्नागिरीकरांनी पुढाकार घेऊन आज सकाळी ७ वाजता मांडवी समुद्र किनारा हजेरी लावत ९ वाजेपर्यंत किनाऱ्याची साफसफाई केली. यासाठी रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर ग्रुपचे गौरांग आगाशे व सहकारी, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि टीम मैत्री, अश्विनी वाटवे, श्रीकांत मराठे, संजय वैशंपायन, संजय आठल्ये, अरुण कीर, गौरांग आगाशे, गुरुदेव नांदगावकर, स्वप्नील सावंत, रिना सुर्वे, शरद शिवलकर, गितेश जामसंडेकर, सुहास जोशी, जयदीप शिंदे, साई राजिवडेकर, महेंद्र पराडकर यांच्यासमवेत पर्यटक, जागरुक रत्नागिरीकरांनी मोहिमेत सहभाग घेतला.
याविषयी बोलताना उद्योजक, “अनबॉक्स”चे प्रमुख गौरांग आगाशे म्हणाले, “रत्नागिरीत खरंच पर्यटक यायला हवे असतील आणि परत परत त्यांनी आपल्या रत्नागिरीच नाव घ्यायला हवं असेल, तर आपण आपली रत्नागिरी स्वच्छ ठेवलीच पाहिजे. त्यातूनच पर्यटन वाढून व्यवसायिकांना चालना मिळेल आणि आपला सर्व स्तरातून विकास होईल. प्रत्येक नागरिकाने ठरवले तर नक्कीच हे कठीण नाही.”
जे रत्नागिरीकर आज ‘स्वच्छ मांडवी’साठी एकत्र आले होते त्यांचे मनापासून आभार मानत आपले योगदान अमूल्य असल्याचे श्री. आगाशे यांनी नमूद केले. दरम्यान, या गोळा केलेल्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक कचरा आणि प्लास्टिक अशा दोन भागात विभागणी करून प्लास्टिक कचरा “अनबॉक्स”मार्फत चालवल्या जाणाऱ्या रिसायकल प्लांटमध्ये नेण्यात आला. यावर प्रक्रिया करून हे प्लास्टिक पुनर्वापरात आणले जाईल असेही श्री. आगाशे यांनी सांगितले.
आपली मांडवी स्वच्छ मांडवी अभियानात ६०० किलो कचरा संकलन
