चिपळूण:-ऐकून जरा नवलच वाटलं ना. पण हे खरं आहे. चिपळूण तालुक्यातील एक पादचारी पूल चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पूल आकले आणि कादवड या दोन गावांना जोडणारा होता. यावरूनच ग्रामस्थ दळणवळणाची कामे करत. मात्र हा पूल कसा आणि कुणी चोरला याविषयी युवा नेते सिध्देश शिंदे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
कादवड ग्रामपंचायत आणि आकले ग्रामपंचायत या हद्दीवरील पादचारी लोखंडी पूल हा सन 2021 च्या महापुरात नदीमध्ये अडकला होता. तो साधारण 2023 पर्यंत नदीमध्येच अडकला होता. त्यानंतर सध्या हा पादचारी पूल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सिध्देश शिंदे यांनी वारंवार पंचायत समितती यांच्याकडे तक्रार केली, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत ठराव होउन रितसर 5 हजार रुपये घेवून भंगार व्यावसायिकाला विकला गेल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. याबाबत संबंधित ग्रामसेवक यांनी असा प्रकार घडला नसल्याचे कारण देत प्रकरण झटकले आहे.
मात्र भंगार व्यवसायिकाने हे भंगार 5 हजार रुपये देउन विकत घेतला असल्याचे सांगितले. असे असले तरी तो पूल दोन गावांना जोडणारा होता. मग एकाच ग्रामपंचायतीने ठराव कसा केला. याबाबत सिध्देश शिंदे यांनी पंचायत समितीच्या बीडीओंना रितसर तक्रार केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.