चिपळूण:-भरधाव वेगात असलेल्या बोलेरो पिकअप गाडीने मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे सी.एन.जी गॅस भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या तीन कारला धडक दिल्यानंतर मुंबईच्या दिशेने पळून जातेवेळी पुन्हा एका कारला धडक देऊन अपघात केल्याची विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. पळून गेलेला बोलेरो अपघात स्थळापासून 1 कि.मी अंतरावर पलटी झाला असून अपघातात एक कारचालक गंभीररित्या जखमी झाला. मद्यपी बोलेरो चालकावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश संदीप आचरेकर (24, देवगड) असे गुन्हा दाखल झालेल्या बोलेरो चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद ओंकार आत्माराम कदम (कळंबस्ते) यांनी दिली. अथर्व सुधीर सुर्वे (24, शंकरवाडी) असे जखमी झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार कदम हे त्याच्या ताब्यातील कार मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील ममता गॅस एजन्सी येथे सी.एन.जी गॅस भरण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील साईट पट्टीवर लाईनमध्ये रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास उभी केलेली होती. त्याच्या कारच्या पाठीमागे दुसरी एक कार उभी होती. तसेच त्या कारच्या मागे पुन्हा उभी असलेल्या एका कारमधून चालक अथर्व सुर्वे बाहेर उतरत असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन वाशी मार्केट येथे आंबा घेणारा जाणारा बोलेरो पिकअप गाडीवरील चालक जयेश आचरेकर याने गाडी भरधाव वेगात चालवून कारमधून उतरत असलेल्या अर्थव ला पाठीमागून जोरदार धडक दिली. यानंतर बोलेरो गाडीचालक अपघात करुन पुढे सीएनजी करता रांगेत मध्ये उभे असलेल्या कारसह ओंकार कदम यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर मुंबईकडे जात असलेल्या पुन्हा एका कारला डावीबाजूस धडक देऊन अपघात केला.
या अपघातानंतर बोलेरो चालक घटनास्थळी न थांबता मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात पळून गेला. यावेळी अपघात स्थळापासून एक कि.मी अंतरावर भरधाव वेगात असलेला बोलेरो पिकअप पटली झाला. एखाद्या फिल्मी स्टाईल प्रमाणे झालेला या अपघातातील बोलेरो चालक याने मद्यपान केलेले हेते. गंभीर जखमी झालेल्या अर्थव याला अधिक उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले आहे. ग्रामीण वार्ताला मिळालेल्या माहितीनुसार,याप्रकरणी त्याच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील कारचे मोठे नुकसान झाले आहे.