रत्नागिरी:-तालुक्यातील शिवारआंबेरे वाडा येथे आंबा कलमाना खत घालून पायवाटेने जाणाऱ्या शेजाऱ्याला दगड मारुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सुरेश पंगेरकर (वय 30), व संतोष बाबु पंगेरकर (वय 65) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी 24 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विश्वास दत्ताराम पंगेरकर हे शिवार आंबेरे येथील वाडा या ठिकाणी आंबा कलमांना खत घालून पायवाटेने जात होते. त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ वैभव पंगेरकर याने त्यांच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. तसेच संतोष पंगेरकर याने त्यांच्या अंगावर लाथ मारुन मारहाण केली. विश्वास पंगेरकर यांची आई त्यांना सोडवण्यासाठी तिथे आली असता दोन्ही संशयितांनी तिला ढकलून देत शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विश्वास पंगेरकर यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बागेतील कलमांना खत घालून परतणाऱ्याला शेजाऱ्यांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, दोघांवर गुन्हा
