24 जणांचा मृत्यू
राजकोट: गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी 24 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
24 मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये लहान मुलांसह अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे. आग कशी लागली याबाबत कोणतीही अद्याप समोर आलेली नाही.
टीआरपी गेम झोनमधून 20 मृतदेह बाहेर काढले
राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली. बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली आहे. आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
गेमिंग झोनच्या मालकावर एफआयआर
आम्ही जास्तीत जास्त मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. गेमिंग झोनची मालकी युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीकडे आहे. झालेल्या मृत्यूबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास केला जाईल.
मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया अकाउंट X वर या प्रकरणाबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, राजकोटमधील गेम झोनमध्ये आगीच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
टीआरपी गेम झोनमध्ये आग लागल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी आयव्ही खेर यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आत किती माणसे अडकली आहेत, याचा अजूनही फारसा अंदाज बांधता आलेला नाही. पंरतु, बचावकार्य सुरू आहे. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल, असं त्यांनी सांगितलं.