चिपळूण:- गेल्या काही महिन्यांपासून रखडेलल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामास सुरवात झाली आहे. उड्डाणपुलाच्या नव्या डिझाईनला राष्ट्रीय महामार्गाची मंजूरी मिळाली असून त्यानुसार कामाला सुरवात झाली आहे.
नव्या डिझाईननुसार दोन पिलरच्यामध्ये आणखी एक पिलर उभारण्यात येणार असून त्याच्या खोदाईला सुरवात झाली आहे. पहिले तयार केलेले गर्डर नष्ट केले जात आहेत. २० मीटरवरती एक पिलर उभारल्यानंतर त्यावर गर्डर टाकून कॉक्रिटचा स्लॅब टाकण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नव्याने तयार होणारा उड्डाणपुल बहादूरशेखनाका येथे कोसळला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर पुलाचे काम थांबवण्यात आले. उड्डाणपुलाच्या पहिल्या डिझाईननुसार ४० मीटर पिलर उभारण्यात आले. त्यासासाठी गर्डरही पुर्णतः तयार झाले होते. मात्र बहादूरशेखनाका येथे वळणावरून हा पुल जात असल्याने डिझाईन मध्ये बदल करण्यात आला. नव्या डिझाईनला तब्बल सहा सात महिन्यानंतर मंजूरी मिळाली. नव्या डिझाईननुसार दोन पिलरमधील गाळ्याचे अंतर २० मीटर राहणार आहे. प्रत्येक २० मीटरवरती एक पिलर उभारण्यात येईल. यापुर्वी तयार केलेले गर्डर बिनकामाचे झाले असून ते नष्ट केले जात आहे. पावसाळ्यापुर्वी नव्याने पिलरची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अतिथी व्हॉटेलच्या समोर खोदाईला सुरवात देखील झाली. पावसाळ्यापुर्वी शक्य तेवढ्या खोदाईवर भर दिला जाणार आहे. तर उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेले गर्डर पुन्हा नव्याने केले जाणार आहेत.
पिलरवरती गर्डर टाकल्यानंतर त्यावर कॉक्रिटचा स्लॅब टाकून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या डिझाईननुसार दोन पिलरमधील अंतर ४० मिटरचे असल्याने राष्ट्रीय महामार्गाला एक वेगळा लूक मिळणार होता. सुशोभीकरणाला देखील उड्डाणपुलाच्या खालील बाजूस वाव होता. मात्र २० मिटरवती पिलर उभारले जाणार असल्याने उड्डाणपुलाचा शो काहीसा कमी होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उड्डाणपुल कोसळल्यानंतर तयार केलेले पहिले गर्डर आणि पॅन नष्ट करावे लागल्याने ठेकेदाराचेही मोठे नुकसान झाले. नव्या डिझाईन नुसार खर्च वाढणार असला तरी तो संबंधीत ठेकेदारास पेलावा लागणार आहे. शासनाकडून उड्डाणपुलासाठी नव्याने वाढीव खर्च केला जाणार नसल्याचेही राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.