रत्नागिरी:- कोकणातील लोककलांचा ‘कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज’ या लोकनाट्याद्वारे चालु असलेल्या प्रसार आणि प्रचाराचे काम लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृती प्रित्यर्थ १४ जुनला कै.शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवलकर, कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार सुनील बेंडखळे यांना जाहीर झाला आहे.
सुनील बेंडखळे हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यकारणी सदस्य आहेत. सदर मिळालेल्या पुरस्काराबद्दल नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष मा.ना.श्री उदयजी सामंत यांनी बेंडखळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
दिनांक १४ जुनला सायंकाळी ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.सुनील बेंडखळे यांनी कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज या लोकनाट्याचे मुंबई सह संपूर्ण कोकणात आत्तापर्यंत जवळपास ४५० प्रयोग सादर केले आहेत. रत्नागिरीतील स्टार थिएटर च्या माध्यमातून आपल्या नाट्य कला जोपासण्यासाठी सुरुवात केली, अनेक नाटक, एकांकिका, शॉट फिल्म, वेबसिरीज, सिनेमांमधून सुनील बेंडखळे यांनी काम केले आहे.
नुकतीच त्यांचा अभिनय असलेली लंपन ही सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज रिलीज झाली आहे.