अहमदनगर : उजनी धरणात बोट उलटून दुर्घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत (Pravara River Incident) एसडीआरफच्या पथकाची बोट उलटली. ही बोट बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये सहाजण बुडाले असून, तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
प्रवरा नदीत दोनजण बुडाले होते. या बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून गेले होते. मात्र, ही बोटच उलटल्याने बोटीतील सहाजण पाण्यात बुडाले. यात तीन जवानांचा मृत्यू झाला तर तीन जण बेपत्ता झाले आहेत. उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान, प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता. याच शोध कार्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार, शोधमोहीमही सुरु होती. मात्र, याच शोधमोहिमेदरम्यान बोट उलटल्याने एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला.
बाळासाहेब थोरात तातडीने घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले. सध्या इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली.
बचावकर्यासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली;तिघांचा मृत्यू
