खेड पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल
खेड:-खेड मधील मुळगाव येथील जांभा खाणीवर महावितरणने लाखो रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी केलेल्या कारवाईची बातमी केली म्हणून खेडमधील पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकारणी मंगळवारी सायंकाळी फोन वरून धमकवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात धमकी चा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार चंद्रकांत बनकर यांना अनोळखी नंबर वरून जीवे ठार मारण्याची धमकी आली असल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर भा.द.वी.स कलम ५०४,५०६,५०७ तसेच महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार मध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम २०१७ चे कलम 3.४. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक १८ मे रोजी खेड तालुक्यातील मुळगाव येथील रामचंद्र बुदर यांच्या जांभ्याच्या खाणीत दोन कमर्शियल मीटर मध्ये वीजचोरी झाल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली, त्यानंतर महावितरण ने तब्बल २६ लाख रुपयांची बिले रामचंद्र बुदर या खान मालकाला दिली या महावितरण च्या या कारवाईची बातमी लावल्याचा रागातून रविवार दिनांक १९ मे रोजी पत्रकार चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात तब्बल तीन वेळा धमकीचे फोन आले ,त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मोबाईल नंबर वरून ते घरी असताना कॉल आला, जांभ्याच्या खाणींच्या बाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील, बातम्यांसाठी कसा फिरता ते बघतो, ऑफिस ला येऊन आमची मुले राडा घालतील, अशाप्रकारे व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, याबाबत सोमवारी पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी या घडलेल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.
या बाबत तात्काळ समंधित धमकवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला व त्याला धमकी द्यायला लावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली जात आहे.