दापोली:-प्राण्यांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण भागांमधून येत असताता. असाच एक प्रकार दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक या गावामध्ये घडला असून माकडांनी गावातील नागरिकांचे जीवन खडतर केले होते.
मात्र वन विभागाने पिंजरा लावून 20 माकडांना कैद केले आहे.
दापोली तालूक्यातील आंबवली बुद्रक या गावाला माकडांनी एकप्रकारे विळखा घातला होता. माकडांनी शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्याचबरोबर घरावरील कौले, कोने, सिमेंटचे पत्रे सुद्धा माकडांना फोडले. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी मनोज केळकर तसेच ग्रामस्थांनी मिळून वन विभाग दापोलीकडे या संदर्भात तक्रार केली व माकडांना पकडून नेण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने परिक्षेत्र दापोली यांच्यामार्फत माकडे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.
सदरची मोहीम राबविण्यासाठी बुधवारी 22 मे रोजी सकाळीच 6 वाजता वन विभागाचे पथक आंबवली बु.या गावामध्ये दाखल झाले. गाव परिसराची पाहणी करुन गावातील माकडांचा अधिवास असलेल्या जागेची निवड करण्यात आली. वन विभागाच्या पथकाकडुन त्या ठिकाणी माकडांचा पिंजरा लावण्यात आला. माकडांना आंबे, शेंगा, केळी आदी फळांचे आमीष दाखवून पिंजऱ्याकडे आकर्षित करण्यात आले. वन विभागाकडुन विकसित करण्यात आलेल्या माकड पकडण्याच्या विशिष्ट पिंजऱ्यामध्ये माकडे दाखल होताच पिंजरा बंद करण्यात आला.
ही मोहीम पार पाडण्यासाठी सा.स.सावंत वनपाल दापोली, शु.दा.गुरव वनरक्षक कोंगळा, श्री.ऑ.अतळेकर वनरक्षक पालघर तसेच आंबवली बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकरी (प्रा) रत्नागिरी (चिपळुण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळुण) वैभव बोराटे (अति.कार्य.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, सप्ताप्पा सावंत वनपाल दापोली यांच्या सहकार्याने पार पडली. तसेच आंबवली बुद्रुक येथील स्थानिक ग्रामस्थ मनोज केळकर, दिनेश तांबे, दिलीप तांबे, चंद्रकांत बंगाल, अनंत बंगाल मुंबई येथून आलेले चाकरमानी आणि स्थानिक सर्वच ग्रामस्थ तसेच महिला मंडळ यांनी वन विभागाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे माकडे पकडण्याची वन विभागाची ही मोहीम यशस्वी झाली.
आंबवली बुद्रुक येथे २० उपद्रवी माकडांना पकडण्यात यश
