वहाळफाटा येथील दुकान गाळ्यांवर कोसळले झाड; इमारतींवरील पत्रे उडाले
चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून बुधवारी पुन्हा एकदा सावर्डे परिसराला जोरदार दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस दररोज सायंकाळी हजेरी लावत आहे. विजांचा कडकडाटसह हा पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत होत आहे. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
महावितरणला देखील दणका बसत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. बुधवारी दुपारपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यामध्ये सावर्डे परिसराला जोरदार दणका बसला आहे. सावर्डे वहाळफाटा येथे दुकान गाळ्यांवर झाड पडले असून पाच दुकानांचे नुकसान झाले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू आहे. जो ठेकेदार हे काम करत आहे, त्याच्या ढिसाळ कामामुळे संपूर्ण सर्व्हिस रोडवर चिखलाचे साम्राज्य तसेच पाणी भरले आहे. सावर्डे कुडप फाटा येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या शेडवरील पत्रे उडून बाजूला असणाऱ्या दुर्गवाडी रोडवर पडले. तसेच बाजूला असणाऱ्या साईव्हीला अपार्टमेंटवर देखील झाड पडले. यामुळे सावर्डे परिसरात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. डेरवण फाट्यावरील महावितरणाची ११ केव्हीचे वीज खांब वादळी पावसाने कोलमडले.