रत्नागिरी : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या टेक्स्टाईल अँड फॅशन डिझाईन डिप्लोमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी व बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझाईन डिप्लोमाच्या विद्यार्थिनींनी अनोखा फॅशन शो सादर केला. माळनाका येथील मराठा भवनमध्ये रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने महिलांसाठी वुमेन्स फेस्ट, उद्योग व्यवसाय प्रदर्शनात हा शो दाखवण्यात आला. याला चांगला प्रतिसाद लाभला.
विद्यार्थिनींनी अभ्यासक्रम शिकताना स्वतः डिझाइन केलेले व शिवलेले ड्रेस परिधान केले होते. बारावीनंतर दोन वर्षांचा एसएनडीटी विद्यापीठ मान्यताप्राप्त डिप्लोमाच्या या विद्यार्थिनी आहेत. या प्रदर्शनात डिप्लोमा इन टेक्स्टाईल अँड फॅशन डिजाईन विद्यार्थिनींनी स्वतः डिझाइन केलेले व शिवलेले विविध ड्रेस, पर्स, पिशव्या, ब्लॉक प्रिंट केलेले टी शर्ट, बांधणीचे ड्रेसेस आणी अभ्यासक्रमांत वर्षभरात बनवलेले विविध डिझाईन्स आदी प्रदर्शीत करण्यात आले होते. तसेच बीसीए, नर्सिंग, बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र, डिप्लोमा फॅशन डिझाईन आदी विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. या स्टॉलला शहरातील विविध मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थिनींना प्रोत्साहीत केले तसेच अशा उद्योग प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थिनींनी बनवलेले ड्रेसची विक्री करावी, असे सुचवले.
फॅशन शोसाठी फॅशन डिझाईन विभाग प्रशिक्षक सौ. सुरभी साखळकर, सौ. वृषाली नाचणकर, ब्युटी पार्लर प्रशिक्षक सौ. श्रद्धा आयरे व सौ. अनुजा अधिकारी, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रसन्न दामले, सर्व स्थानिय व्यवस्थापन समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन लाभले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. भुर्के यांच्यासह ज्येष्ठ रोटरी सदस्य, पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
रोटरी क्लब आयोजित वुमेन्स फेस्ट प्रदर्शनात प्रथमच महर्षी कर्वे संस्थेच्या महाविद्यालयांच्या मुलींचा फॅशन शो सादरीकरण करण्यास दिल्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे रोटरी क्लबचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे स्थानिक सदस्य व कर्मचारी, कॉलेज विद्यार्थनी व त्यांचे पालक व प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला उद्योजिका व नागरिक उपस्थित होते.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी केला प्रथमच फॅशन शो
