चिपळूण:-चिपळूण-कराड मार्गावर पिंपळी येथे पुण्याहून चिपळूण आगाराकडे येणाऱ्या दोन एसटी बसेसमध्ये अपघात झाल्याची घटना बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालकासह तिघेजण जखमी झाले असून अपघातात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले. या दोन्ही बसेसमधून 67 प्रवासी पवास करत होते. श्रावण शंकर बुरटे, सुनिता श्रावण बुरटे, अंजली श्रावण बुरटे (सर्व रा.गोवळकोट), तर वाहक नेताजी शितोळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पुण्याहून रात्री 9.30 वाजता निघालेली पुणे-चिपळूण, तर चिंचवडहून रात्री 10.30 वाजता निघालेली चिंचवड-चिपळूण (शिवशाही) या दोन्ही बसेस चिपळूण आगाराकडे निघाल्या होत्या. एकापठोपाठ एक असलेल्या या दोन्ही बसेस कुंभार्ली घाट उतरुन पुढे पिंपळीमार्गाने चिपळूण येत असताना गतिरोधक पार करण्यासाठी पुणे-चिपळूण बसच्या चालकाने वेग कमी केला असता मागून आलेल्या चिंचवड-चिपळूण (शिवशाही) बसच्या चालकाला वेग नियंत्रणात न आल्याने त्याने पुढील बसला जोरदार धडक दिली.
पुणे-चिपळूण बसममध्ये 34 पवासी, तर चिंचवड-चिपळूण (शिवशाही)मध्ये 33 पवासी होते. अपघात घडताच प्रवाशांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. शिवशाही बसमधील प्रवाशांना अखेर अपत्कालीन मार्ग असलेल्या दरवाजातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. या अपघातात श्रावण बुरटे, सुनिता बुरटे, अंजली बुरटे, वाहक नेताजी शितोळे हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळाची माहिती मिळताच आगारातील पदाधिकारी तसेच अलोरे-शिरगाव पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.