उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
महावितरणचे अथक प्रयत्न यशस्वी
संगमेश्वर:-बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला झोडून काढले. या मुसळधार पावसात संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. जवळपास 13 तास वीज नसल्याने नागरिक हैराण झाले होते. मोबाईलही डिस्चार्ज झाल्याने अनेकांशी संपर्क तुटला होता. कॉम्प्युटर बंद असल्यामुळे कामे रखडली होती. फ्रिज मधील शीतपेय खराब झाली होती. यामुळे व्यावसायिकांवर नुकसान सहन करण्याची वेळ आली. उक्षी, वांद्री, तळेकांटे, मानसकोंड, परचुरी, कोळंबे, सोनगिरी, आंबेड, कुरधुंडा, ओझरखोल, निढलेवाडी, माभळे परिसरात वीज नसल्याने प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र 13 तासांनी जीव पुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता कोळंबे, परचुरी परिसरात झाडे उन्मळून पडल्याने आणि वीज खांब व तारा तुटल्याने पडल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता असे सांगण्यात आले. मात्र महावितरणच्या 13 तासांच्या अथक प्रयत्नाने परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.