पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखल
चिपळूण : रामपूर एस.टी स्टॅन्ड ते नारदखेरकी हा ९ कि.मी. रस्ता प्रंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला. सदर रस्त्यावर खडीकरण करून मातीचा भर टाकण्यात आला. मात्र, डांबरीकरण केले नाही. सदर रस्त्याचे काम निष्कृष्ठ असल्याचे सेक्रेटरी राजेंद्र खोडदेकर, रामपूर आवटेवाडीचे अध्यक्ष अजय आवटे, रोहिदासवाडीचे कार्यकर्ते महेश सावर्डेकर यांनी सांगितले.
अवकाळी वादळी पाऊस झाला. सर्व रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य रस्ता पावसामुळे, चिखलामुळे निसरडा झाला. दुचाकी वाहने चिखलात अडकून अपघात होण्यास सुरुवात झाली आहे. रामपूर गोसावीवाडी, रोहिदासवाडी, आवटेवाडी, देवखेरकी येथील रहिवासी चिखलाच्या साम्राज्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. सदर रस्ता पहिल्याच पावसात मळबा टाकल्याने चिखल, निसरडा, मृत्यूचा सापळा झाला आहे. अपघात होऊ लागले आहेत. चार महिने पाऊस, मातीचा नुसता मळबा यामुळे वाहतुकीसाठी अयोग्य असून आजारी माणसाला दवाखान्यातही नेता येणार नाही. रामपूर एस. टी.स्टॅन्ड, गिरीवाडी, रोहिदासवाडी, आवटेवाडी देवखेरकी रहिवाशांची कुचंबणा झाली आहे. सदर रस्त्यावर कंत्राटदारांने डांबराचा पहिला टप्पा पूर्ण केला नाही. खडी टाकून रोलर फिरवून वाहतुकीसाठी रस्ता योग्य करावा, अशी मागणी रामपूर देवखेरकी, नारदखेरकी ग्रामस्थांची आहे. रस्ता आरणार नाही, खडी टाकून चिखल होणार नाही, रस्ता निसरडा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या रस्त्याची दुरुस्ती कंत्राटदाराने करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.