चिपळूण: गेली २५ वर्षे आपल्या बहारदार शाहिरीच्या माध्यमातून रसिक मनाला तृप्त करण्याचे कार्य शाहीर शाहिद खेरटकर करत आले आहेत. त्यांच्या शाहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे जात, धर्म, पंथ, वर्ण यापलीकडे जाऊन मानवतावाद प्रस्थापित करण्यासाठी त्यांची लेखणी सरसावते आणि त्यांच्या पहाडी आवाजातून लोकांचे प्रबोधन होते. शाहीर शाहिद खेरटकर यांना “युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय “शाहिरीरत्न पुरस्कार २०२४” जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. २६ मे रोजी कन्याकुमारी येथे पार पडणार आहे.
शाहिद खेरटकर यांनी कोकणची लोककला जाखडी (शक्ती तुरा) मनापासून जोपासली आणि तेच रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे त्यांचे उत्तम साधन बनले. शाहीर स्वतः एक उत्तम कवी, गायक, वक्ते, निवेदक आणि पत्रकार अशा विविध भूमिकेतून समाजात वावरताना दिसतात. साहित्य क्षेत्रात देखील त्यांनी मजल मारली आहे. त्यांचा प्रकाशित झालेला “ललकारी” हा कवितासंग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल घेऊन “हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास संस्था(कार्यक्षेत्र भारत) कराड यांच्या वतीने दिला जाणारा “युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय “शाहिरीरत्न पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा २६ मे रोजी कन्याकुमारी येथे पार पडणार आहे. शाहीर शाहीर खेरटकर यांचे सदर पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.