रत्नागिरी :रत्नागिरीतील पहिली जीम सुरू करणारे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे रत्नागिरीतील ७९ वर्षीय जीमपटू श्रीकृष्ण ऊर्फ भाई विलणकर यांनी शंकर महाराज पुण्यतिथिनिमित्त १५०० जोर मारण्याचा संकल्प अवघ्या १ तास २५ मिनिटात पूर्ण केला.
बालपणी मोठा भाऊ रोहिदास याच्या प्रभावाने भाईंनी ढोलकी, पेटी वाजवणे, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती खेळणे, पालखी नाचवणे इत्यादी गोष्टीत प्राविण्य मिळवले होते. त्यानंतर शहरातील लक्ष्मीचौक येथील व्यायामशाळेत त्यांनी कुस्ती, रोप मल्लखांब, मल्लखांब, व्यायाम प्रकार, कबड्डी आदींमध्ये काैशल्य मिळविले. पुढे शेती करण्याचा निर्णय घेऊन ते पत्नीच्या मदतीने शेती करू लागले. मात्र, सायंकाळी न चुकता कबड्डीचा सराव कायम होता. यातून त्यांनी कबड्डीचा झुंजार क्लब स्थापन केला.
शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त कुवारबाव येथील जीममध्ये भाई विलणकर यांनी १५०० जोर मारण्याचा संकल्प केला आणि केवळ १ तास २५ मिनिटात तो पूर्णही केला. प्रत्येक जोरावेळी शंकर महाराजांचे नामस्मरण सुरूच होते.
काही काळ रत्नागिरीतील मनोरुग्णालयात शिपाई म्हणून नोकरीही केली. नोकरीत असताना मनोरुग्ण आणि कर्मचारी यांची टीम घेऊन अनेक ठिकाणी विजय मिळवले. मनोरुग्णालयात गणेशोत्सवाचे जिवंत देखावे सुरू केले. मुख्य लिपिक झाल्यानंतर व्यायाम, मैदान यापासून दूर राहावे लागायचे. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. मित्र आणि शिष्य सदानंद जोशी यांच्या सल्ल्यानुसार रत्नागिरीत पहिली जीम सुरू केली. काही कालावधीनंतर कुवारबाव येथे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर दुसरी जीम सुरू केली.
‘श्रीमान’ किताब मिळवायचाय
काही वर्षांपूर्वी भाई विलणकर यांची बायपास झाली होती. मात्र, तरीही त्यांनी ७५ व्या वर्षी रत्नागिरी श्रीमान किताब मिळवला. आत्ताही ते ३०० अर्ध जोर आणि १०० जोर मारतात. ८० व्या वर्षी पुन्हा रत्नागिरी श्रीमान किताब मिळवायची त्यांची इच्छा आहे.
कोणत्याही वयात व्यायाम केलाच पाहिजे. स्वामी समर्थांवर माझी अपार श्रद्धा आहे. त्या श्रद्धेतून आणि इच्छाशक्तीमुळे मी १५०० जाेरांचा संकल्प सुमारे दीड तासात पूर्ण केला. कुठलाही थकवा जाणवला नाही. मुलांनी घरी व्यायाम करायला हरकत नाही. झाडाला दोरी बांधून, जोर, बैठका, सूर्यनमस्कार घालून चांगला व्यायाम होतो. घरचे अन्न खावे ते उत्तम असते. बाहेरचे खाणे, पूरक खाणे, स्टेरॉइड या शरीराला हानिकारक आहेत.
७९ वर्षीय भाई विलणकर यांनी दीड तासात मारल्या १५०० जोरबैठका
