संगमेश्वर:- संगमेश्वर बस स्थानकासमोरील महाकाय वृक्ष मुंबई गोवा महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण्याच्या कामामध्ये येत असल्याने हजारो पक्षी झाडावर बसलेले असताना आणि अनेक घरटी असताना रातोरात त्याच्यावर पोकलेन चालविण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी आणि पक्षी प्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा महावृक्ष व्यावसायिकांना, रिक्षा चालकांना, ग्राहकांना आणि पक्ष्यांना त्याच्या विशाल फांद्यानी प्रत्येकावर जमेल, तशी सावली देत होता.
या वृक्षावर असणाऱ्या असंख्य पक्षांना उद्या काय होणार आहे, याची माहिती नसून चौपदरीकरणाच्या कामात तो आता तोडला गेला असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्येकांनी सन्मानाने आपापली दुकानांची जागा मोकळी करून दिल्याने रूंदी करणाचे काम जोरदार चालू झाले. रात्री हजारो पक्षी झाडावर बसलेले असताना आणि झाडावर असंख्य घरटी असताना अचानक रात्रीच्या दरम्यान ठेकेदार कंपनीने भल्या मोठ्या झाडावर पोकलेन चालवला. काही दिवसांपूर्वी झाडे तोडत असताना वन विभागाचा कोणताही परवाना नसताना अचानक झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र वन विभागाला सांगितल्यानंतर वन विभागाने कारवाई करीत झाडे जप्त केली होती.