गोवा:-मडगाव, नेपाळ देशातील डेमू रेल्वेच्या व्यवस्थापन व देखरेख याचे कंत्राट मिळाल्यानंतर आता कोकण रेल्वेने आपले लक्ष केनियामध्ये केंद्रीत केले आहे.
या देशातील रेल्वेचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखविली असून यासंबंधीची प्राथमिक बोलणी केनियन सरकारकडे चालू आहेत,अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन मुख्य सरव्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.
कोकण रेल्वेचे काम आम्हाला जागतिक स्तरावर न्यायचे आहे. त्याचाच हा एक भाग असल्याचे झा यांनी सांगितले. कोकण रेल्वेला नवी मुंबई येथील मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापन व देखरेखीचेही कंत्राट मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यातील आपल्या योजनांबद्दल बोलताना, गोव्यात करमळी रेल्वेस्थानकावर ‘लेक व्ह्यू रेस्टॉरंट्स’ उभारले जाईल. तसेच, मडगाव स्थानकासह इतर महत्त्वाच्या स्थानकांवर ‘रेंट-अ-बाईक’ सुविधा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती दिली. मडगावसह कोकण रेल्वे मार्गावरील सात स्थानकांवर ‘रेंट-अ-बाईक’ सेवा चालवण्यासाठी ऑपरेटर शोधण्यासाठी निविदा जारी केलेल्या आहेत.
गोव्यातील मडगाव, थिवी, करमळी, काणकोण यांसह कर्नाटक राज्यातील कारवार, गोकर्ण आणि कुमठा रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू होणार आहे. सर्व सात स्थानकांसाठी एकाच कराराद्वारे चालवल्या जाणार असून परवानाधारक दुचाकींना ३०० चौरस फूट जागा उपलब्ध केली जाणार असून भाड्याने दुचाकी उपलब्ध केली जाणार आहे. १८ जून ही निविदेची अंतिम तारीख आहे, असे त्यांनी सांगितले.
संतोष कुमार झा यांनी अधिकृतपणे ‘कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित’चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते १९९२ च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत. कठोर निवड प्रक्रियेनंतर १ नोव्हेंबर २०१३ रोजी या पदावर त्यांची नियुक्ती निश्चित झाली. ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये २८ वर्षांच्या अनुभव असलेल्या झा यांनी यापूर्वी संचलन आणि व्यावसायिक संचालक म्हणून काम केलेले आहे.
मडगावात ‘रेल आर्केड’चे काम
मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बसस्थानकासाठी उभारण्यात आलेल्या शेडच्या ठिकाणी आता रेल आर्केडचे काम सुरू आहे. यासाठी ठेकेदाराकडून पाया घालण्यात आलेला असून शेड उभारणी केली जात आहे. या रेल आर्केडमध्ये विविध वस्तू, खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी पर्यटकांना व प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
कोकण रेल्वे करणार केनियाच्या रेल्वेचे काम – संतोषकुमार झा
