केशभूषा या कौशल्य प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक
रत्नागिरी:-दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेत (इंडिया स्किल २०२४) रत्नागिरीतील यश दिनेश चव्हाण याने ”केशभूषा” या कौशल्य प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले. इंडिया स्किल ही खेळाडूंमधील कौशल्य दाखवणारी देशातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यामध्ये एकूण ७५ कौशल्यांचा समावेश आहे. यश आता फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
यश चव्हाण याने वयाच्या बाराव्या वर्षापासूनच वडिलांच्या सलूनमध्ये काम करण्यास सुरवात केली. लहान वयातच यशने केशभूषेमधील विविध कौशल्य आत्मसात केली. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशने मुंबईत उदय टक्के अॅकॅडमीमध्ये दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर यशने २०२१ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये सहभागी घेतला. यामध्ये यशने महाराष्ट्रामधून सुवर्णपदक तसेच प्रादेशिक स्तरावर रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रीय स्तरावर मेडालियन ऑफ एक्सेलन्स हे पदक मिळाले होते. त्यानंतर दोन वर्ष अपार मेहनत घेऊन नियमितपणे सराव करून २०२३-२४ च्या इंडिया स्किल स्पर्धेत सहभागी झाला. यामध्ये संपूर्ण भारतामध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी यश सज्ज होत आहे.
यशच्या या यशामध्ये त्याचे वडील दिनेश चव्हाण व आई दीक्षा चव्हाण खंबीरपणे उभे आहेत. तसेच उदय टक्के, अथर्व टक्के, हर्षदा टक्के, राज रिकिबे, प्रथमेश सावंत, शिरीन मर्चंट, मृणाल डोंगरे, महेश चाळके, अशोक शहा व उदय टक्के इन्स्टिट्यूटच्या पूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे.