चिपळूण:-महिला प्रवाशाला रिक्षा चालकाने अर्ध्या वाटेत सोडल्याने याच रागातून त्या महिलेच्या पतीने रिक्षा चालकास बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पागझरी परिसरात घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या एकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर (पूर्ण नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबची फिर्याद रणविर दत्ताराम चव्हाण (47, शिवाजीनगर) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान रणवीर चव्हाण हे शिवाजीनगर येथून पागझरी येथील साकेत अपार्टमेंट येथे भाडे सोडून पुन्हा पागझरी परिसरातील मिलिटरी वसतीगृहाच्या समोरील रस्त्यावर त्याचे मित्र रिक्षा चालक आंब्रे यांच्यासोबत बोलत थांबले होते. यावेळी सागर (पूर्ण नाव माहित नाही) हा तेथे दारु पिवून आला व त्याने रणवीर चव्हाण यांना ‘तू माझ्या बायकोला घरापर्यंत का सोडले नाहीस. अर्ध्या वाटेत का सोडलेस’ असे बोलून त्यांना शिवीगाळ करत जवळच असलेल्या रस्त्यावरचा दगड उचलून चव्हाण यांच्या डोक्यात मारुन डाव्या बाजूला दुखापत केली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात रणवीर चव्हाण यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार सागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गैरसमजातून रिक्षा चालकाला मारहाण
