हजारो कोटींच्या बदल्यात कोकणचे नैसर्गिक सौंदर्य हरवतेय
चिपळूण:-पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत अनेक प्रदूषकारी प्रकल्प असल्यामुळे कोकणचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बस्स प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नकोच असा सूर येथे आयोजित शाश्वत कोकण परिषदेत निघाला. तसेच प्रत्येक औद्योगिक वसाहतीत स्थानिक प्रक्रिया उद्योग असलेच पाहिजेत अशी मागणीही करण्यात आली. उरलेसुरलेले कोकणचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर प्रदूषणकारी प्रकल्प न आणता तरुणांना रोजगार देणारे, स्थानिक फळांपासून उत्पादन घेणारे प्रकल्प आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.
नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात नुकतेच शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे. त्याचा लेखाजोगा मांडण्यात आला. त्यामुळे महामार्ग नको, डोंगर हवेत-वडके शहर नियोजनाबाबत बोलताना पराग वडके म्हणाले की, एखादा महामार्ग ठीक आहे. मात्र डोंगराची वाट लावून अनेक महामार्ग करण्याची काहीही गरज नाही. मोठ्या प्रमाणात होणारी जगलतोड हे महापूराचे मूळ आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीला महत्व देण्याची गरज असून नगर परिषदेत पर्यावरण संरक्षण विभाग असणे गरजेचे आहे. प्रा. गुलाब राजे म्हणाले की, खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत सुमारे ३०० हुन अधिक कारखाने आहेत. त्यात ७२ कारखाने केमिकलचे आहेत.
त्यातील १० कारखान्यांची स्वतंत्र जलशुष्दीकरणाची यंत्रणा सोडली तर सर्वांचे सांडपाणी सामूहिक जलशुध्दीकरण केंद्रात जाते. तेथे पाण्यावर खरोखरच नियमानुसार प्रक्रिया होते की नाही हा संशोधनाचा भाग आहे. एमआयडीसी म्हणते पाणी शुध्द करून सोडले जाते तर जनता म्हणते अशुध्द पाणी सोडले जात असल्याने मासे मरतात. मात्र काहीही असले तरी कारखान्यांमधून येणारे पाणी शुध्द करून ते ग्रव्हीटीने ग्रामस्थांना दिले. तर खेड तालुक्यातील अनेक गावामध्ये बारमाही शेती शक्य आहे. वणवा हा प्रकार आपले फार मोठे नुकसान करीत असून त्यात पेटून जाणारे लाखो टन गवत, भातापासून निघणारा पेंढा यापासून जनावरांचे खाद्य बनवणारे कारखाने येथे आले तर शेतकऱ्यांसह अनेकांना रोजगार मिळेल. निसर्ग मित्रचे संस्थापक भाऊ काटदरे म्हणाले की, मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातीलही काही मोजकी ठिकाणे सोडली तर सर्वच भागात कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. हीच परिस्थिती आता ग्रामीण भागात आहे. त्यामुळे उघड्यावर टाकले जाणारे प्लास्टीक खाऊन मरणारे प्राणी, पक्षी आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वाचवले पाहिजेत. प्रज्ञा पावसकर म्हणाल्या की आज येथील ४८ गावात भोई समाज आहे.
मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. ४० वर्षे मागे जाता माझे आजोबा दिवस रात्र मच्छीमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कारण तितके मासे मिळत होते. त्यानंतर वडिलांनी मासेमारीसाठी बोट घेतली. मात्र मासेच मिळत नसल्याने त्यांना ती विकावी लागली. यावरून भोईसमाज किती अडचणीत आला आहे हे दिसून येते. मुंबईतील सत्यजित चव्हाण म्हणाले की, कोकणातील सर्व विल्यधामध्ये अशा परिषदा येऊन त्यातून नेणारी कोकण विकासाची भूमिका येत्या विधानसभा निवडणुकीत मांडावी असे मत व्यक्त केले. राजन इंदुलकर पानी शाश्वत कोकण ही चळवळ संपूर्ण कोकणात पसरवण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे. फक्त मागण्या मागून काहीही होणार नाही. परिषदेला राम रेडीज, विलास महाडीक, सुधीर भोलते, धीरज वाटेकर निखिल भोसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन मल्हार इंदुलकर यांनी केले.