शेतात बसला होता लपून
दापोली:-दापोली तालुक्यातील कोळथरे येथे आपल्या मित्राचा खून करणारा संशयित नराधम पोलिसांना गुंगारा देत होता. मित्र विशाल मयेकर याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांना 3 दिवस गुंगारा देणारा शशिभूषण सनकुळकर याला पोलिसांनी शेतातून ताब्यात घेतले.
मित्रा-मित्रांमध्ये दारू पिताना वाद होवून कोळथरेत खुनाचा प्रकार प्रथमच घडला होता. विशाल मयेकर, शशिभूषण सनकुलकर व मनोज आरेकर यांची चांगली मैत्री असल्याचे गावात चौकशी केली असता समजले. हे तिघेही जण गावामध्ये आंबे काढणे, नारळ काढणे अशी कामे करत असत. घटना घडली त्यादिवशी रात्री सर्वजण मनोज आरेकर याच्या कोळथरे खालचा भंडारवाडा येथे एकत्र दारू प्यायला बसले होते. तिथे त्यांचा क्षुल्लक कारणाने नेहमीप्रमाणे वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद विकोपला गेला. यावेळी शशिभूषण सनकुळकर याने स्वत:जवळील कोयता विशाल मयेकर याच्या डोक्यात घातला.
हा वार वर्मी लागून विशाल मयेकर रक्तबंबाळ झाला. त्याच अवस्थेत त्याने चालत मदतीसाठी ग्रामस्थांना बोलवण्याचा प्रयत्न केला. तो सुमारे 250 ते 300 फूट चालत गेला. मात्र तोपर्यंत अतिरक्तस्त्राव होऊन तो खालचा भांडारवाडाच्या लगत असणाऱ्या कोळथरे मोहल्ला येथे रक्ताच्या थारोळ्यात पडला व तेथेच गतप्राण झाला. मित्रावर कोयत्याने वार केल्यानंतर शशिभूषण सनकुळकर हा लागलीच फरार झाला. त्याचा पोलीस कसून शोध घेत होते. 3 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर एका शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तिथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.