खेड:-उन्हाळयात असह्य उकाड्याने हैराण झाल्याने तरुण नदी किंवा जेटीत अंघोळीसाठी जातात. तालुक्यातील तुंबाड-भोईवाडी जेटी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये अन्य तिघेजण बचावल्याची माहिती समोर आली आहे.
अंकेश संतोष भागणे (19 बहिरवली- मधलीवाडी), सौरभ हरिचंद्र नाचरे ( 19 पन्हाळजे) अशी दोन मृत युवकांची नावे आहेत.
बहिरवली-मधली वाडी व पन्हाळजे भागणेवाडी येथील पाच युवक सोमवारी दुपारच्या सुमारास तुंबाड जेटी येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघांना पोहताही येत नव्हते. तरी देखील ते पोहण्यासाठी जेटीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. ही बाब अन्य तीन युवकांच्या निदर्शन आल्यानंतर आरडाओरडा करत ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य हाती घेतले.
ग्रामस्थांनी याबाबतची खबर येथील पोलीसाना दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेटीत बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जाळे पाण्यात फेकले. अथक प्रयत्नानंतर दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सायंकाळी उशिरा दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.